फणस (इंग्रजीत जेक फ्रूट) हे एक प्रकारचे फळ आहे. फणसात गरे असतात.
फणस हे फळ आकाराने फार मोठे असते. फणसाच्या आवरणाला चारखंड असे म्हणतात. चारखंडाला काट्यांसारखी अनेक टोके असतात., त्यामुळे फणस हा बाहेरून काटेरी खडबडीत असतो. फणसाच्या आतील भागात मधोमध काठीसारखा भाग असतो. त्याला पाव असे म्हणतात. त्यालाच अनेक गरे लागलेले असतात. एका गऱ्यामध्ये एक बी असते. तिला आठोळी म्हणतात. फळाच्या शेवटच्या टोकाला आलेल्या गऱ्याला टेंबळी म्हणतात. छोट्या कच्च्या फणसाला कुइरी म्हणतात.
फणसाला किंवा त्याच्या झाडाला निचूळ असाही एक शब्द आहे.
फणसाचे दोन प्रमुख प्रकार आहेत.
बरका ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा अधिक मधुर आणि रसाळ असतो. बरका फणस हा प्रामुख्याने कोकणात आढळून येतो. बरकाचे गरे काप्याच्या गरांपेक्षा जास्त चिकट असतात.
कापा ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा बरक्या फणसापेक्षा कमी गोड आणि रसाळ असतो. कापा फणस हा प्रामुख्याने देशावर आढळून येतो. कापा फणस कापायला बरकापेक्षा थोडा सोपा असतो.
फणसाच्या कापा आणि बरका याप्रमाणेच विलायती फणस हीसुद्धा एक जात आहे. या जातीचा फणस प्रामुख्याने भाजीसाठी वापरतात. सकल्या, नीर आणि डगूळ याही फणसाच्या जाती आहेत.
फणसाची लागवड महाराष्ट्रातील कोकण भागात होते. तसेच देशावर किंवा घाटावरही फणस आढळून येतात. फणसाचे झाड हे आकारमानाने मोठे असते. झाडाच्या बुंध्याला फणस लटकलेले असतात.
फणसाचे गरे खाल्यावर त्यावर विड्याचे पान खाऊ नये. तसे करणे हे विरुद्धाशन आहे.
झाडाचे लाकूड खेळणी, तंबोरा आणि वीणासारखी वाद्ये, उच्च प्रतीचे फर्निचर, कोरीवकाम असलेल्या शोभिवंत वस्तू, लाकडी पिंजरे, खोकी वगैरेंसाठी उत्तम असते.
फणस (इंग्रजीत जेक फ्रूट) हे एक प्रकारचे फळ आहे. फणसात गरे असतात.